मला समजलेलं नाटक


तिसरी घंटा वाजते, हलकेच पार्श्वसंगीत वाजू लागतं आणि निवेदकाचे अतिपरिचित शब्द कानी येतात, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत... तेच शब्द प्रत्येकवेळी वेगळे वाटणारे, अंगावर येणारा काटा मात्र ओळखीचाच असतो. एक नवीन ओढ त्या नाट्यप्रती असलेली जागी होते आणि देहभान हरपून समोरच्या रंगमंचावर वावरणाऱ्या त्या कलाकारांच्या जगात आपण हलकेच विरून जातो.

नाटक, नाटक म्हणजे नेमकं काय? खरं तर त्याची विशिष्ट अशी व्याख्या नसावी बहुतेक, तो एक अनुभव असतो, सुखावणारा! एक वेगळंच जग बेभान होऊन जगायला शिकवणारं ! रंगमंचावर फिरणारी विविध छटा असलेली पात्र आपलीशी वाटू लागतात. ती गोष्ट सादरकर्त्याची राहता आपलीच गोष्ट आहे असं वाटू लागतं. हीच गोष्ट कधी हसवते, कधी रडवते, कधी प्रेमरसात बहरते तर कधी विचारात पाडते.

विंगेत कलाकार तयार असतो. अंगावर पोशाख चढताच तो आपल्या भूमिकेत केव्हाच पोहोचलेला असतो. आता प्रतीक्षा असते ती प्रवेशाची. प्रवेशापुर्वी विंगेत उभं असतानाची हुरहुर रंगमंचावर पाऊल ठेवता क्षणीच संपते आणि साकारत असलेल्या भूमिकेला न्याय द्यायचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू होतो.

नाटक उभं राहण्यात खरी मेहनत असते ती पडद्यामागच्या कलाकारांची. पडद्यामागचे खरे कलाकार! पात्र जिवंत करणारे रंगभूषाकार, वेशभूषाकार. रंगमंच सजवणारं नेपथ्य, प्रकाशयोजना. अगदी एक - दोन मिनिटांच्या ब्लॅकआउट मध्ये नेपथ्य बदलणारे कलाकार खऱ्या अर्थाने नाटकाला जिवंत करत असतात. सोबतच प्रसंगाला अनुसरून वाजणारं पार्श्वसंगीत, प्रसंगी एखादं गाणं तो प्रयोग आणखी देखणा करतं.

लेखकाने निर्माण केलेल्या कलाकृतीला दिग्दर्शक आपल्या नजरेतून रंगमंचावर साकारत जातो आणि त्याच्या हया प्रयत्नांना साथ देत रंगमंचावरच्या, पडद्यामागच्या कलाकारांनी उभा केलेला प्रयोग म्हणजे नाटक !!! 

-गौरी अजय चिंदरकर.
०३/०९/२०१७.


Comments

Popular posts from this blog

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

रेषा