रिहर्सल डायरीज #1 डस्ट पार्टीकल्स
खिडकीतून किंवा कौलाच्या फटीतून घरात गुपचूप डोकावणारा उन्हाचा उबदार कवडसा,
त्यात प्रवास करणारे असंख्य धुळीचे कण,
प्रत्येक कणाची वेगळी गती,
वेगळा मार्ग आणि दुसऱ्या कणाला त्रास न देता चालत राहण्याचा गुणधर्म!
खरंतर इतकी वर्ष इथे न तिथे तो कवडसा दिसतचं होता पण त्याचा इतका विचार,
इतकं निरीक्षण कधी केलं गेलं नव्हतं.आज सकाळी खिडकीतून येणारे असे असंख्य प्रवासी पाहिले आणि त्यादिवशीच्या रिहर्सलची आठवण झाली.
ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे डॉ.
काकांकडे जमलो.
रोजच्या रिहर्सलची सुरुवात वेगळ्या प्रकारे होते,
त्यादिवशी डस्ट पार्टीकल्स ह्या नवीन खेळाने झाली. त्यादिवशी काकांनी खेळाचे नियम सांगितले.
ते काहीसे असे होते,
काका गाणं म्हणणार आणि आम्ही त्यांच्या मागून गाणं म्हणत हॉलमधे चालायचं. चालताना गाण्याची लय पकडण्याचा प्रयत्न करायचा. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला हवं तसं फिरताना इतरांना स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. थोडा वेळ ही गंमत अनुभवली.
त्यादिवशी डस्ट पार्टीकल्सचे नियम तर कळले होते पण त्या मागची थिअरी खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवशी समजली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा रिहर्सल सुरू झाली ती डस्ट पार्टीकल्सनेच. काकांनी पुन्हा नियम सांगितले आणि खेळ सुरू झाला. त्यात आमची मस्ती पण सुरू झाली, मग मात्र आम्हाला थांबवून काकांनी सांगितले की फिरताना तुम्ही विसरून जा की तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय,
तुम्ही काय करता, अगदी
सगळं.
फक्त आणि फक्त गाण्यावर लक्ष्य द्यायला सांगितलं. त्यानंतर गाण्याची लय आणि चालणं असा प्रवास चालू झाला.
मी सुद्धा बाकी सगळ्या गोष्टी विसरून चालायला सुरुवात केली आणि एका वेगळ्याच वातावरणात गेल्याचा खुप भारी अनुभव आला. त्या खेळाला डस्ट पार्टीकल्स असं नाव देण्यामागचं प्रयोजन पण लक्षात आलं.
त्या कणांसारखीच आमचीही प्रत्येकाची वेगळी गती होती, वेगळे मार्ग होते आणि आम्ही पण एकमेकांना त्रास न देता चालत होतो. कदाचित त्या कणांचा गुणधर्म आमच्यात उतरला होता आणि आमचा तो प्रवास आम्हाला प्रसन्न करत होता.
आतापर्यंत गुपचूप बसूनच मनन-चिंतन करावं लागतं हा भ्रम नाहीसा झाला आणि डस्ट पार्टीकल्स होण्यात एक वेगळीच मज्जा आहे हे जाणवलं.
आता परत रिहर्सल्स असतील आणि पुन्हा डस्ट पार्टीकल्सची गंमत अनुभवण्यास मी सज्ज असेन!
- गौरी अजय चिंदरकर.
१६/०९/२०१७
Khup ch Chan...
ReplyDelete