प्रवास
नवीन दिवस उजाडतो आणि मावळतो, वर्ष सुरू होतं आणि संपत, आयुष्याचही तसचं काहीसं!
प्रत्येकाचा प्रवास निराळा... प्रत्येकाची सुरुवात वेगळी आणि शेवटही! आणि गंमत म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण ह्या दोन्ही गोष्टी जोडणारी अख्खी वाट कशी चालायची हे आपल्याच हातात असतं.
ह्या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो तो आपला दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून केलेली मेहनत! ह्या दोघांची जोडगोळी प्रवासात असलेले अडथळे पार करायला मोलाची मदत करते.
असाच कधीतरी कुठेतरी प्रवास करत असताना त्या त्या क्षणी मनात रेखाटलेली काही धावती विचारचक्र.
विंडो सीट
लोकल मधली विंडो सीट मला मात्र नेहमीच एक खुप मोठा प्रश्न पाडते. एकमेकांसमोर तोंड करून असलेल्या लोकल मधल्या सीट्स, काही ट्रेन ज्या दिशेला चाललीय त्या दिशेला तोंड करून असलेल्या तर काही अगदी विरुद्ध दिशेला... त्यातली नक्की कोणती जागा पकडावी...
ज्या दिशेने ट्रेन चाललीय त्या दिशेला बसून सरळ जगण्याचा आनंद घ्यावा ... सहज सोपं जसं आयुष्य नेतय तसं जात रहावं की विरुद्ध दिशेला बसून कापलेलं अंतर शांतपणे बघत बसावं...
भूतकाळाला जास्त महत्त्व देऊ नये असं म्हणतात... पण तोच भूतकाळ आज आपण जिथे आहोत तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी, अजून पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा असेल तर?
ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा माझा वेगळाच अट्टाहास आहे... आतापर्यंत केलेली मेहनत, संघर्ष जर नवी उमेद देत असेल तर काय हरकत आहे जुन्या गोष्टींना धरून पुढे जाण्यात... नेहमीच सरळ सोप्पं प्रवाहाप्रमाणे वाहण्यापेक्षा थोडा वेगळा विचार करून थोडसं खूश होण्यात पण वेगळीच गंमत असते...
गाडी पुढे जातंच राहते... आपलं तोंड कुठल्याही बाजूला असलं तरी... आपल्या हातात असतं ते जुन्या गोष्टीतून नवी उमेद तयार करणं...
समुद्र
समुद्र! नेहमीच इतका सुखावणारा का असतो? त्याची गाज नेहमीच कानात साठवून ठेवावी अशी मनाला प्रसन्न करणारी... दूर दूर वर पसरलेला पार क्षितिजाला भिडलेला तो अथांग पसारा.
दूरवर कुठेतरी दिसणाऱ्या अंधुकशा होड्या, त्यावर फडकणारे झेंडे, काही समुद्र किनारी आजूबाजूला दिसणारे अवाढव्य डोंगर, त्या समुद्राच्या भव्य पसाऱ्यासमोर इवलेसे भासणारे! आमच्या देवगडच्या समुद्र किनाऱ्यावरुन तर पवनचक्क्या पण दिसतात... वाऱ्यासोबत आपल्याच तालात फिरत असतात.
खूप लांबचा प्रवास करून हळूच आपल्या पायाला स्पर्शून पुन्हा त्याच समुद्रात मिसळून जाणाऱ्या आनंददायी लाटा आणि सोबत पायाखालची सरकत जाणारी वाळु!
कुठून बरं येत असावा तो आणि पुन्हा कुठे जात असावा?
आपल्या पायाला हळूवार स्पर्श करत, एका क्षणात पुन्हा त्या एव्हढ्या व्यापात मिसळणारा तो!
त्याच येणं अगदी हळूवार पण बेधडक तर जाणं त्याहून अगदी उलट - शांतपणे, ज्या किनाऱ्याला धडकुन आलाय त्याची आठवण सोबत घेऊन जाणारं.
येताना मनाला उत्सुकता देणारं तर जाताना पुन्हा भेटीची आस.
कंटाळत नसेल का तो असा येरझारा घालून?
थकत नसेल का तो इतका लांबवर रोज प्रवास करून?
एखादा विसाव्याचा क्षण असेल का त्याच्या आयुष्यात? आणि तो वाट पाहत असेल का त्या क्षणाची?
की असाच अविरत प्रवास त्याच्या नशिबी?
असे असंख्य प्रश्न रोजचं पडत असतात, बऱ्याच गोष्टींबद्दल... आपापल्यापरिने आपण उत्तरही शोधतो त्यांची... काही वेळा चूक बरोबरच्या चौकटीत न बसवता निव्वळ आनंदासाठी.
आपला प्रवासही तसाच चालू राहतो या प्रश्न उत्तरांच्या खेळात... गरज असते ती खिलाडूवृत्तीची, जिद्दीची, पुन्हा पुन्हा उठून चालत राहण्याची... आपल्या ध्येयाच्या प्रवासाकडे!
- गौरी अजय चिंदरकर
०६/०१/२०२१




उत्कृष्ट👌
ReplyDelete💯💯💯💯💯
ReplyDelete👌👌
ReplyDeleteखूप छान 💯
ReplyDeleteसमुद्र अगदी मनातला उलडगलास गौरी....खुप मस्त
ReplyDeletemast gauri...
ReplyDeletemast gauri👍👍
ReplyDeleteएकदम भारी गौरी 👌🏻👌🏻
ReplyDeleteउत्कृष्ट लेखन आणि अप्रतिम विचार.
ReplyDeleteGreat Gourii
ReplyDeleteअप्रतिम 😍❤️👌🏻
ReplyDeleteछान
ReplyDeleteKhupch chhan👏👏
ReplyDeleteBharich
ReplyDeleteखूपच छान !!
ReplyDeleteGauri khupach chan
ReplyDelete