बाईंचं अवकाश!


खरं तर खूप काही वाचायचं असतं, वेगवेगळ्या विषयांवर, घटनांवर, माणसांवर पण ह्या न त्या कारणांमुळे राहून जातं. मग ह्यावर पर्याय मिळाला तो आता सहज उपलब्ध असणाऱ्या ऑडिओबुक्सचा.

पुस्तक हातात घेऊन ते वाचणं, पान पलटणं, नवीन पुस्तकाचा सुगंध अश्या सगळ्याच सुखाचा आनंद मिळणं शक्य नव्हतं ह्या पर्यायामुळे पण करून बघू म्हणून एक पुस्तक वाचायला... खरंतर ऐकायला सुरुवात केली.

सुरुवात एखाद्या मराठी पुस्तकाने करू असं आधीच ठरलेलं होतं. याच एक कारण म्हणजे खूप जास्त लक्ष देऊन ऐकावं लागणार नव्हतं. मातृभाषा ही कधीही, कितीही घाईत अगदी काम करता करता कानावर पडली तरी ती उमगत जाते, परिणाम घडवत जाते, शब्दांमागच्या भावभावना मनाच्या पटलावर उमटत जातात. तसं बघायला गेलं तर मी हा स्वतःवर केलेला एक प्रयोगचं होता. जसं काहीही लिहिताना मला कागद पेन जवळचं वाटतं तस वाचतानाही मला ई-बुक पेक्षा हाताला होणारा पुस्तकाचा स्पर्श आणि पुस्तक हातात घेऊन वाचण्याची पद्धतचं जास्त जवळची वाटते. हा प्रयोग एक वेगळा होता ह्याच मुख्य कारण म्हणजे मी वाचणार नव्हते तर ऐकणार होते... अख्खं पुस्तक!

मग पहिलं पुस्तक म्हणून सुनीता देशपांडेचं 'मनातलं अवकाश' हे पुस्तक निवडलं. या पूर्वी सुनीताबाईंचं काही लिखाण वाचनात आलं नव्हतं. एक-दोन ऑडिओ क्लिप्स ऐकल्या होत्या तेव्हढचं. ह्या पुस्तकाचं वाचन केले होतं शुभांगी गोखले यांनी. शुभांगी गोखलेंचा आवाज, अभिनय परिचित होता. बऱ्याचदा वाचताना,जर हा अभिनय असता तर त्यांनी ह्यावर कसे हावभाव केले असते हेही डोळ्यासमोर येई.

आज खरंतर लिहायला सुरुवात केलेली ती सुनीताबाईंच्या पुस्तकांबद्दल पण नेहमीप्रमाणे अनाहूतपणे जो काही अनुभव ह्या नवख्या प्रयोगाच्या निमित्ताने घेतला तो भराभर कागदावर उतरला.

तर, मनातलं अवकाश म्हणजे सुनीता बाईंच्या काही लेखांचा संग्रह. 'आठ आण्याच्या लग्ना'पासून झालेली सुरुवात हळुहळू वेगवेगळे विषय हाताळत 'शिशिरा'पर्यंत येऊन पोहोचते.
प्रत्येक गोष्ट नावीन्यपूर्ण पण तरीही थोडाफार विचार करायला लावते.

बाईंच्या मराठी भाषेची श्रीमंती, भाषेचा हळूवारपणा, त्यातून निर्माण होणारा आपलेपणा, तर कधी बाईंच्या मूळ स्वभावातली बंडखोरीसुद्धा या मधे व्यक्त होते.
त्यातही 'व्हॅन डाइकचं वाळवंट' आणि 'गोष्ट एका कोळियाची' हे लेख जास्त भावतात.

हा लेख म्हणजे काही बाईंनी लिहीलेल्या साहित्यावर समीक्षा देण्यासाठी नाही, कारण माझा तेव्हढा अभ्यासही नाही आणि कुवतही नाही. पण काही पुस्तकं खुप आवडतात, भावतात... इतरांनीही ती वाचावी असं वाटत म्हणुन हा अट्टाहास!

मनातलं अवकाश वाचल्यापासून सुनीता देशपांडे या व्यक्तिमत्वाविषयीची उत्सुकता वाढली आणि लगेचचं त्याचं 'आहे मनोहर तरी' हे अरुणा ढेरे यांच्या आवाजातलं पुस्तक ऐकायला घेतलं. एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या बायकोची ही कहाणी... जरी पु.ल. चा उल्लेख ह्यात येत राहिला तरी ती स्वतंत्र अशी सुनीता बाईंची गोष्ट आहे, आणि वाटली! कारण प्रत्येक प्रसंगी असलेल्या त्यांच्या ठाम, पण प्रामाणिक मतांमुळे. त्यांची खरी गोष्ट! कुठेही मोठेपणाची झालर नाही किंवा आयुष्यात केलेल्या चूका प्रांजळपणे मान्य करताना कमीपणा नाही. जे चूक ते चुकचं अश्या निर्भीड, बंडखोर प्रवृत्तीच्या सुनीताबाईंचं पुस्तकही तसंच... निर्भीड, खरंखुरं! आत्मचरित्र नाही म्हणता येणार ह्या पुस्तकाला, अगदी बाईंनी म्हटल्याप्रमाणे हा मुक्त प्रवास होता त्यांच्या आठवणींचा... हे पुस्तक बाईंनी काही वर्षांच्या कालावधीत लिहिलय त्यामुळे कधीकधी तशी सलगता जाणवत नाही पण उत्सुकता जराही कमी होत नाही.

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या आठवणी मांडताना त्या सोबतच वेगवेगळी ठिकाणे, त्या राहिलेली घरे, अनुभवलेली माणसं, त्यांचे स्वभाव सगळं काही बाईंनी मांडलंय. वडिलांच्या शेवटच्या क्षणापासून सूरु होणार हे पुस्तक विविध वळण घेत जातं. पु.ल.देशपांडे या नावामागे कणखरपणे उभी असलेली स्त्री आपल्याला दिसते. 1942-47 च्या काळात घरदार सोडून, शिक्षण अर्ध्यावर सोडून देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेली, प्रसंगी भूमीगत राहिलेली एक तरुण मुलगी आश्चर्यचकित करते. अत्यंत शिस्तप्रिय, स्वतंत्र विचारसरणीच्या एक सुंदर स्त्रीचे दर्शन आपल्याला होतं.

कोकणात जन्मलेल्या, निसर्गप्रेमी, अगदी वकीलालाही लाजवेल अश्या पद्धतीने आपली बाजू मांडणाऱ्या, जे जे मनापासून करावसं वाटलं ते ते अगदी मनापासून जगणाऱ्या सुनीताबाई!

मग स्वातंत्र चळवळीत, मोर्चात सगळ्यांच्या पुढे असलेली मिस ठाकूर असो किंवा मग विविध संस्थांसाठी काम करत, पुलंचे सर्व व्यवहार सांभाळत, अगदी रंगमंचावर 'सुंदर मी होणार' ह्या नाटकात दीदी राजेंच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांची दाद मिळवत आणि तितक्याच आनंदाने घरकामात वावरत असणाऱ्या सुनीताबाई असोत, सगळंच भारावून टाकतं.

स्वतःवर प्रेम करणाऱ्या, आपली तत्व जपणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या बाईंच्या आठवणींची ही गोष्ट वाचताना मंत्रमुग्ध करते.

पुस्तकाच्या सुरुवातीला बाईंनी म्हटल्याप्रमाणे सुफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तराची कहाणी नव्हती तर साठा प्रश्नांची कहाणी होती.
सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच!

जेव्हढं वाचत जावं तेव्हढी बाईंबद्दलची उत्सुकता वाढत जाते आता वाचनाच्या नव्या यादीत बाईंची उरलेली पुस्तकं तर आहेतच सोबत अजून काही ऑडिओ/ व्हिडिओ जर सापडले तर ती पर्वणीच!


- गौरी अजय चिंदरकर
१४/०४/२०२०

Comments

  1. सुंदर व्यक्तीचित्रण 👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप छान , मस्त मांडणी

    ReplyDelete
  3. खूप छान.... तुझं हे लिखाण वाचून माझा मनात सुनीता बाईचं लिखाण वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली... हीच तुला मझाकडून पोचपावती.... Keep it up������

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. काका !

लिखाणाबद्दलचं 'लिखाण'

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !