निमित्त 'कोसला'चे...



स्थळ: इंटरसिटी एक्सप्रेस, ठाणे स्टेशन
वेळ: सकाळी ७ वाजून १४ मिनिटे

वेळेवर ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. आधीच आरक्षण केलेलं असल्यामुळे मी नियोजित डी६ डब्यात माझ्या सिटजवळ गेले. अगोदरच माझ्या बाजूच्या सिटवर खिडकीपाशी एक आजोबा वर्तमानपत्र वाचत बसले होते. मी तिथे पोहोचताच त्यांनी एका निरर्थक कटाक्षाने पाहिलं आणि पुन्हा आपलं काम करू लागले. मी बॅगेतून माझा स्कार्फ आणि कोसला बाहेर काढून माझ्या सिटवर ठेवली आणि बॅग कॅरियर वर ठेवली. आजोबांनी माझ्या सिटवरची कोसला पाहिली आणि एक छानसं स्मितहास्य करत माझ्याकडे पाहिलं. कदाचित त्याचंही कोसलाशी काही जवळचं नातं असावं किंवा ह्या एका पुस्तकामुळे त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असावा.

बऱ्याच दिवसांपासून कोसला वाचण्याची इच्छा होती. योगायोगाने माझ्या एका ऑफिस सहकार्याने मला ती भेट दिली. कोसला वाचून पूर्ण झाली. खरंतर कोसला बद्दल खूप काही ऐकून होते पण कोसला वाचण्यापेक्षाही ती अनुभवता आली याचा आनंद जास्त आहे.

जवळजवळ ५५ वर्षांची कोसला! पण अजूनही तिचं अस्तित्व का टिकून आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होते. सुरुवातीला थोडीशी जड वाटणारी अनोळखी भाषा. वगैरे, उदारणार्थ, आता हे नवीनच हे तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा १-२ वाक्यांगणिक येत राहतात. अर्थ लावताना थोडीशी तारांबळ उडते पण नंतर हेच शब्द भाषेची मजा दाखवतात. हीच निराळी भाषाशैली कादंबरीला अजून देखणं बनवते. हळूहळू भाषेची सवय होत जाते आणि जड वाटणारी शैली सुद्धा आपलीशी होऊन जाते.

पांडुरंग सांगवीकर नामक पात्राचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यातून पुढे सरकत राहतो. बरचसे मजेशीर प्रसंग हसवतात, बरचसे प्रसंग विचार करायला लावतात. बऱ्याच गोष्टी आपल्याच आहेत असे वाटून जातं. बऱ्याचदा एकच भाग परत परत वाचावासा वाटतो. कादंबरीशी एकरूप होताना पांडुरंगचे विचार आपल्याही डोक्यात कधी सुरू होतात ते कळत नाही आणि त्याच भावनाविवश अवस्थेत आपण वाचत राहतो. वाचनाचा वेग त्या विचारांप्रमाणेच वाढलेला असतो. पांडुरंगची होणारी घालमेल आपलीच आहे असं वाटत राहतं. विशेषतः लेण्यांना भेट दिल्यावर तिथे बुद्धांची मूर्ती पाहून पांडुरंगाच्या मनाची अवस्था, बहीण गेल्याचं दुःख पचवू न शकलेली त्याची मानसिकता खूप काही बोलून जाते. त्याची तऱ्हेवाईक पद्धतीने केलेली मांडणी सार्थ वाटते.

त्यावेळेची जीवनशैली, कुटुंबव्यवस्था, पांडुरंगचे मित्र, करमणुकीची साधनं, हॉस्टेलमधले प्रसंग, पांडुरंग आणि सुरेशचे  पराक्रम, त्याने घातलेले गोंधळ आणि शेवटी शेवटी त्याने वर्णन केलेली निरनिराळी माणसं कादंबरी बोलकी बनवतात.

कादंबरीच्या शेवटी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नेमाडेंनी लिहिलेला लेख कोसलाचा जन्म कसा झाला याचा सविस्तर वृत्तांत देतो. कोसला इतकीच ही गोष्ट सुद्धा तेव्हढीच अफलातून आहे. वयाच्या २५व्या वर्षी लेखकाने लिहिलेली कादंबरी ५६व्या वर्षात पदार्पण करतेय. नेमाडेंनी म्हटल्याप्रमाणे गेली ५० वर्ष साहित्य रसिकांनी कोसलाला सांभाळलं. पण पुढची अगणित वर्ष ही ज्ञानपीठ पुरस्कृत कादंबरी कुठल्या न कुठल्या रूपात जिवंत राहिलं ह्याची खात्री आहे.

कोसला संपल्यानंतर पण एक वेगळी अस्वस्थता शिल्लक राहते. प्रत्येक प्रसंग पुन्हा पुन्हा डोकं वर काढत राहतो. कोसला वाचून झाली असली तरी ती आयुष्यभर आठवत राहिल!  सोबत राहिल!


-गौरी अजय चिंदरकर
०१/०२/२०१९


Comments

  1. "कोसला" ...अप्रतिम!😊👌

    ReplyDelete
  2. गोरी तुझा प्रत्येक लेख अप्रतिम असतो सायकल असो की रंग आकाशाचे असो .तुझे चांगले चांगले लेख सतत वाचनात येत राहो ही सदिच्छा

    ReplyDelete
  3. गौरी खूप सुंदर लेख लिहिला आहे.सांगवीकर पुन्हा समोर आला असे वाटले

    ReplyDelete
  4. अशीच मनमुक्तपणे शब्दांची उधळण करत रहा............😊😘

    ReplyDelete
  5. "कोसलावर कोसला इतकेच लिहिता येईल !" असं लिहिलंय कोणीतरी 'कोसला'त ते खरंच आहे नाही !
    काय तो coincidence पुलंनीच लिहलाय वाटतं.... दुःखाचं निखळ दर्शन वैगेरे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

रेषा