सायकल




भस्सकन कागद ओढवा... हाताला मिळेल ते पेन घेऊन घासाघीस सुरू करावी. डोक्यातल्या, मनातल्या, हृदयातल्या असंख्य अव्यक्त भावना आपल्याला काही समजण्यापूर्वीच कागदावर जाऊन चिकटाव्यात. नेहमी काय लिहावं हा मोठा प्रश्न पडत असतो पण पुढे लिखाण कोणत्या दिशेने घेऊन जावं हा साधा विचारही न करता जे वाटेल ते फक्त लिहत सुटावं... व्यक्त व्हावं... मोकळं व्हावं... असं फार कमी वेळा होतं.

आजही तसंच काहीसं दिशाहीन...

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ह्यांचा प्रमुख पाहुणे म्हणून समावेश असलेला 'सूर नवा ध्यास नवा ' च्या एक भागाचा व्हिडिओ पाहिला. एक भावनांवर प्रेम करणारा मनुष्य तर दुसरा शब्दांना धरून सूर लावणारा... ( अर्थात हेही संदीप खरेंच्या शब्दात) आणि त्यातही संदीप खरेंनी सादर केलेली 'सायकल' ही कविता.

एका बापाचं भावविश्व संदीप नेहमीच त्याच्या कवितेतून मांडत आलाय. प्रत्येक वेळी ते भिडतं आणि अभिप्राय म्हणून दोनच गोष्टी होतात, एक म्हणजे डोळ्यातून वाहणारी आसवं आणि दुसरी म्हणजे निशब्दता!

आपोआप बॅक ऑफ द माईंड विचारचक्र सुरू होतात.कवितेतील चपखल शब्द त्रास देतातच पण त्याहूनही जास्त विचार करायला लावतात त्या भावना.

किती दूर निघून आलो आपण. आणि मागे वळून पाहताना खरंच तो बाबा ठिपका होऊन पाहत राहिला फक्त आपल्याकडे...
"बाबा सायकलचं कॅरिअर घट्ट पकडं" ते "सोड आता हिसके देतेय सायकल" ह्या दोन ओळीतला प्रवास म्हणजे एखाद्या बापाची आपल्या मुलाला किंवा मुलीला घडवताना केलेली आयुष्यभराची मेहनत!

सगळ्यांच्याच आयुष्यात एक पार मोठी जबाबदारी पार पाडून दूरवर तरीही पाठीशी उभा राहिलेला बाबा कधी लांब जातो ते कळतंच नाही.

लहानपणी कुशीत घेऊन झोपणारा बाबा,
शाळेतल्या आपल्या कौतुकाने खुश होणार बाबा,
'तू जा पुढे मी बघतो बाकीच काय ते' असं सतत म्हणणारा बाबा,
कमावतो झाल्यावरही हळूच पैसे देणारा बाबा,
एका स्थिर गंभीर चेहऱ्यामागे तितकाच हळवा कोपरा जपणारा बाबा,
आपल्यावर केलेल्या संस्कारांनी आपल्याला आयुष्यभर पुरणारा बाबा!

बाबा! हा एकच शब्द पुरेसा आहे पुढे जाण्यासाठी, खंबीरपणे उभं राहण्यासाठी, पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी आणि चूक सुधारण्यासाठीही!

संदीप खरेंच्या 'दमलेल्या बाबा'पासून ते 'सायकल' पर्यंत व्यक्त झालेला बाबा खरंच खूप भावनाविवश करतो आणि त्याहूनही जास्त एक जाणीव करून देतो की जितकी बाबा ला आपली गरज आहे त्याहूनही कैक पटीने जास्त आपल्याला बाबाची गरज आहे.

- गौरी अजय चिंदरकर
02 डिसेंबर 2018

Comments

  1. खूप छान मस्तच आहे

    ReplyDelete
  2. भारी👌🏼👌🏼👌🏼

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. मस्त गौरी 👌👌

    ReplyDelete
  5. Very touching...keep up the good work ..

    ReplyDelete
  6. त्रिवार सत्य ...

    ReplyDelete
  7. कितीही कठोर वाटले तरी आतून हळवे असे बाबा...
    छानच गौरी....👌👌👌

    ReplyDelete
  8. Amol chindarkar...... Mesmerizing

    ReplyDelete
  9. Kharay ekdum baba baddal sagla... Baba astatach ase...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

रेषा