रिहर्सल डायरीज #3 आनंद नवनिर्मितीचा!



नाटक ! कधी ठरवून केलेलं, कधी सहज सुचलेलं तर कधी ओघात चालू असलेलं. नाटक बसवण्याची पण प्रत्येक दिग्दर्शकाची आपली अशी वेगळी शैली. कधी एकांकिका, कधी दोन अंकी नाटक तर कधी नाट्यछटा.


कलाकारांचे गट करून त्यांना विषय द्यायचा आणि दिलेल्या वेळात त्या विषयावर सादरीकरण करायचं असा सुरुवातीच्या काही रिहर्सलचा आमचा ठरलेला साचा. बऱ्याचदा गटांना वेगवेगळा विषय दिला जातो पण काही वेळा ह्याला अपवाद म्हणून एकाच विषयावर सादरीकरण होतं.


खरी मज्जा असते ती बालगटातील सादरीकरणांची. त्यांची विचार करायची पद्धत, इतरांचा विचार करता मनात येणाऱ्या गोष्टी नाटकाच्या रूपाने मांडण्याची कला. मग त्यात सुद्धा नाटकाचे बारकावे लक्षात ठेवत सादरीकरण सजवण्याचा केलेला निरागस प्रयत्न.


कधी 'बालपण' ह्या विषयावर सादरीकरण करताना छोटा ओंकार घाडी आजोबांची भूमिका साकारतो. त्याच्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी तो त्याच्या नाटकातल्या नातवंडांना सांगतो तर कधी 'पाहुणे' सादर करताना सांची एका खाष्ट आजीची भूमिका लिलया पार पाडते. 'मराठी' ह्या विषयावर नाटक करताना तर मुलं out of the box जाऊन विचार करतात. मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून एक दिवस घरी फक्त मराठी बोलायचं ठरवतात आणि मग रोजच्या वापरात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठी शब्द शोधता शोधता होणारी त्रेधातिरपीट स्वरा आणि तिचा गट अगदी सहजतेने सादर करतात. पूर्वीचा काळ दाखवण्यासाठी दिशा, सोहम सावकारी थाट उभा करतात तर कधी शेकोटी भोवती बसून भुतांच्या गोष्टी सांगितल्या जातात. असेच अनेक विषय आमची नाटकवेडी मुलं मोकळेपणानं हाताळतात.


विषय एक, सादरीकरण अनेक !  ही एक संकल्पना. एकचं विषय किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतो याच समर्पक उदाहरण. मग कधी व्यक्तिरेखा बदलतात तर कधी मांडणी. ह्याच उदाहरण म्हणजे लहान मुलांना 'गंमत' हा विषय होता. ह्या विषयावर नाटक करणं म्हणजे काही गंमतीचा विषय नव्हे ! मग ही गंमत साकारताना कधी ही मुलं जत्रेत घेऊन जातात आणि मग हळुच मनाच्या एका कोपऱ्यात डॉक्टर काकांचं गाणं सुरु होतं 'जत्रा म्हणजे मज्जा मज्जा, जत्रा म्हणजे मज्जा मज्जा, जत्रा म्हणजे आनंदाचा मोठा पाळणा...' तर कधी हीच गंमत थेट CID च्या टीममध्ये घेऊन जाते. कधी शाळेतल्या गमतीजमती सांगतात तर कधी नाट्यशिबिर भरवतात. 'चंचल हे मन' मध्ये कधी आजी-नात, कधी दोन बहिणी, कधी आई मुलगी, कधी हॉस्टेलवरच्या रूममेट्स तर कधी शेतकरी अशा व्यक्तीरेखा घेऊन सादरीकरण होतं.
प्रत्येकाचा त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येक सादरीकरण हे दुसऱ्या सादरीकरणाहुन वेगळं आणि जिथल्या तिथे बसलेलं असतं.


हातात असलेल्या १०-१५ मिनिटांत विषयावर चर्चा करून त्यातून एक सादरीकरण करायचं, प्रत्येक वेळी एक नवं आव्हान तेव्हढ्याचं जोशात स्वीकारायचं. वेळेचं, विषयाचं आणि नाटकाच्या मर्यादांचं भान ठेवुन रोज एक सादरीकरण करणं म्हणजे नवनिर्मितीचा आनंद !

- गौरी अजय चिंदरकर

०८/१२/२०१

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

रेषा