Posts

Showing posts from 2020

तेरड्याच्या बिया

Image
लहानपणी पावसाळ्यात, शाळेतून घरी येताना रस्त्याच्या आजूबाजूला रुजलेल्या तेरड्याच्या बिया अलगद न फुटता काढून मग त्या मुद्दामहून फोडणे म्हणजे आवडीचा विरंगुळा. तेरड्याच्या बिया फोडल्यावर त्यांचा आकार म्हणजे कृष्णाने ज्या कालियामर्दनचा वध केलेला अगदी तसाच! काल-परवा रस्त्यावर फेरी मारत असताना तेरड्याची झाड पाहिल्यावर त्याच्या बिया काढून फोडण्याचा मोह आवरला नाही.  काही गोष्टी अशा असतात की त्या कधीच बदलत नाहीत. काही जागा, व्यक्ती आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणी कितीही काळ लोटला तरी जशाच्या तशा डोळ्यासमोर उभ्या राहतात. मनात असलेली त्या गोष्टींसाठीची उत्सुकता कधीच कमी होत नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत राहतो आणि आपला तो प्रवास अखंड चालूच असतो, आज इथे तर उद्या तिथे!  आपण राहिलेली घरं, जागा, तिथले रस्ते, माणसं मनात घर करून राहतात. त्या प्रत्येक रस्त्याला, जागेला आपला प्रवास माहिती असतो, ती जागा आपल्या प्रवासाचा एक अविभाज्य घटक असते. आपल्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात ती स्वतःचं महत्त्व टिकवून असते. पुन्हा कधी त्या ठिकाणी गेल्यावर तिथे आपण घालवलेल्या वेगवेगळ्या सुख-दुःखाच्या ...

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

Image
दिल है छोटा सा, छोटी सी आशा मस्ती भरे मन की, भोली सी आशा चाँद तारों को, छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा... कुठेही हे गाणं कानावर पडलं किंवा सहज कधीतरी आठवलं तरी मन एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतं ते म्हणजे पुण्याच्या गोसावी वस्ती मधलं समिधा सेंटर! गेल्या वर्षी 'The Granny Cloud' ला १० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने पुण्यात सुनीता मावशींच्या घरी एक छोटंसं get together केलं. डॉ. शाहरुख हैदराबाद वरून आला होता, जिऊ पुण्यातचं होती आणि मी मुंबईवरून गेलेले, योगायोगाने Liz सुद्धा काही कारणाने भारतात आलेली. आम्ही सगळ्यांनी मिळून समिधा सेंटरमधल्या Granny Cloud सेंटर ला भेट दिली. पुण्यासारख्या अर्बन शहरातला गोसावी वस्ती म्हणजे झोपडपट्टीचा परिसर. पण त्याच परिसरात एका दहा बाय दहा च्या खोलीत Granny Cloud चं सेंटर चालवलं जात होतं.  माझ्यासाठी SOLE आणि The Granny Cloud म्हणजे जिव्हाळ्याची गोष्ट! पण मी अनुभवलेलं Granny Cloud म्हणजे एक स्वतंत्र इमारत, काचेच्या भिंती, त्यात लहान मुलांना आकर्षित करेल असं रंगीबेरंगी फर्निचर, खूप सारे कम्प्युटर्स आणि तेही इंटरनेट connection असलेले. (आता जरी इंटरनेट co...

बाईंचं अवकाश!

Image
खरं तर खूप काही वाचायचं असतं, वेगवेगळ्या विषयांवर, घटनांवर, माणसांवर पण ह्या न त्या कारणांमुळे राहून जातं. मग ह्यावर पर्याय मिळाला तो आता सहज उपलब्ध असणाऱ्या ऑडिओबुक्सचा. पुस्तक हातात घेऊन ते वाचणं, पान पलटणं, नवीन पुस्तकाचा सुगंध अश्या सगळ्याच सुखाचा आनंद मिळणं शक्य नव्हतं ह्या पर्यायामुळे पण करून बघू म्हणून एक पुस्तक वाचायला... खरंतर ऐकायला सुरुवात केली. सुरुवात एखाद्या मराठी पुस्तकाने करू असं आधीच ठरलेलं होतं. याच एक कारण म्हणजे खूप जास्त लक्ष देऊन ऐकावं लागणार नव्हतं. मातृभाषा ही कधीही, कितीही घाईत अगदी काम करता करता कानावर पडली तरी ती उमगत जाते, परिणाम घडवत जाते, शब्दांमागच्या भावभावना मनाच्या पटलावर उमटत जातात. तसं बघायला गेलं तर मी हा स्वतःवर केलेला एक प्रयोगचं होता. जसं काहीही लिहिताना मला कागद पेन जवळचं वाटतं तस वाचतानाही मला ई-बुक पेक्षा हाताला होणारा पुस्तकाचा स्पर्श आणि पुस्तक हातात घेऊन वाचण्याची पद्धतचं जास्त जवळची वाटते. हा प्रयोग एक वेगळा होता ह्याच मुख्य कारण म्हणजे मी वाचणार नव्हते तर ऐकणार होते... अख्खं पुस्तक! मग पहिलं पुस्तक म्हणून सुनीता देशपांडेचं '...