रंग आकाशाचे...
मी गावात वाढलेली आणि त्यातही मुख्य गावापासून ३-४ किलोमीटर अंतरावर माझं घर. आजूबाजूला घरांची जास्त दाटीवाटी नाही. प्रसन्न शांतता, अंगणात उभं राहिल्यावर दूरवर दिसणारा परिसर. दूर डोंगरावर असलेल्या आंब्याच्या बागा, गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला काळा दगड, हळूच माडाच्या झाडाआड लपलेलं दूरवर दिसणारं एखाद दुसरं घर, रस्ता जास्त रहदारीचा नसल्याने कधीतरी जाणारी वाहनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसरात्र दिसणारं मोकळं विस्तीर्ण आकाश.
सकाळी घरासमोरून उदयाला येणारा सूर्य आणि संध्याकाळी घरामागे अस्ताला जाणारा तोच सूर्य यांच्यात असलेला जमीन आस्मानाचा फरक रोज अनुभवता यावा यासारखं दुसरं भाग्य नाही.
क्षणाक्षणाला बदलणारं आकाश पाहणं म्हणजे खूप गंमतीशीर गोष्ट.
पिवळ्या तांबुस सुर्यकिरणांचे दिवसभर चालणारे खेळ आणि मग त्याच उत्साहाने भर घालायला येणारा चांदोमामा.आकाशात लुकलूकणाऱ्या चांदण्या, कधी त्यांच्या मधून थाटात लाइट दाखवत जाणारं विमान, सप्तर्षीनीं रोज दिलेलं दर्शन. चंद्राच्या सर्व कला अगदी ग्रहण आणि सुपरमून सुद्धा कुठलेही कष्ट न घेता नजरेस पडावा म्हणजे पर्वणीच!
दिवसा आकाशात फिरणाऱ्या विमानांचा तर वेगळाच थाट.
लांबलचक पांढरा धूर सोडत विहरणारे ते पक्षी.
कधी कधी तर दोन बाजूंनी येणारी विमानं एकमेकांच्या रेषा छेदून जातात आणि ती जवळ येताच एकमेकांना धडकतील की काय असं एकदम मनांत धस्स होतं.
दुसऱ्या क्षणी ती एकमेकांपासून खूप दूर गेलेली असतात अगदी सफाईतपणे!
पावसात हमखास दिसणारा इंद्रधनुष्य,
पडत येणारा पाऊस,
त्यात कधी पडणारं कोवळं ऊन,
सगळीकडे पसरलेली हिरवळ.
अगदी कातळावर उगवणारी छोटी छोटी वेगवेगळ्या प्रकारची गवतं.
कधी निरभ्र स्वछ
'आकाश' तर कधी विजेच्या कडाडणाऱ्या प्रकाशासह भरून येणारं 'आभाळ'.
सकाळी सकाळी किलबिलाट करणारे विविध पक्षी आणि संध्याकाळी दमून भागून आलेले विजेच्या तारांवर समूहाने शांतपणे बसलेले पक्षी आपसूकच त्यांच्या दिवसभराच्या कष्टांची जाणीव करून देतात.
- गौरी अजय चिंदरकर
१७/०२/२०१८
👍👍👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete👍👍👍
ReplyDeleteपुन्हा एकदा चांगलं वाचायला मिळाले धन्यवाद
ReplyDeleteभारी 👌👌👌
ReplyDeleteMast😁👌👌
ReplyDeleteThank you all :)
ReplyDeletemetro citi til chanderi duniyechi bhural padlelya pratekala, gava kadche sundar niragas jivan Kay aste he sangnara ek surekh lekh..👌
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteअप्रतिम. I could feel the air
ReplyDelete