डॉ. काका !


डॉ. काका! तशी आमची ओळख जूनीच. खरंतर मला आमची पहिली भेट आठवतही नाही, इतकी लहान होते मी. आठवणींच्या सिनेमाची negative film डोळ्यासमोरून फिरू लागते ती म्हणजे काकांच्या दवाखान्यापासून.

स्थळ : रुपाली हॉस्पिटल, शिरगाव

डॉ. काकांची दवाखान्यातली तपासणीची खोली. टेबल, खुर्ची आणि गळ्यात स्टेथोस्कोप घालून बसलेली मी. अविर्भाव असा की जणू काही मीच डॉक्टर आहे. कधी टेबलवर, कधी खुर्चीवर, कधी काकांच्या मांडीवर तर अगदी कधी काकांच्या खांद्यावर माझी स्वारी. काकांच्याच खिशातल्या पेनाने प्रिस्क्रिप्शनच्या कागदावर चार रेघोट्या ओढल्या म्हणजे ह्या डॉक्टरचं काम संपायचं! खरंतर ही सुरुवात नसावी पण मला आठवते ती हीच.



तर डॉ. काका ! मुळचे साताऱ्याचे, मुंबईत MBBS पूर्ण केलेलं आणि नंतर शिरगावात स्थिरावलेले. पेशाने डॉक्टर पण मनाने खरेखुरे कलाकार!

लहानपणी काकांकडून खुप गोष्टी ऐकल्या, त्यांच्यासोबत छान गाणी म्हटली पण मी जशी जशी मोठी होत गेले तसं काकांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू समोर उलगडत गेले. मुलांमध्ये कायम रमणारे काका, त्यांच्यासोबत लहान होऊन मस्ती करणारे काका, मुलांचं सगळं ऐकणारे काका, त्यांना छान छान माहिती देणारे काका, बऱ्याचदा मुलांना विचार करायला लावणारे काका, मुलांच्या मनातल्या गोष्टी मांडायला शिकवणारे काका म्हणजे आमचे डॉ. काका!
काका म्हणजे लेखक-दिग्दर्शक,
काका म्हणजे वाचक-कवी,
काका म्हणजे गायक- वादक,
काका म्हणजे चित्रकार- मूर्तिकार,
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
काका म्हणजे आयुष्य कसं जगायचं हे समजलेला आणि आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान असलेला एक सच्चा माणूस!

काका कायम काहीना काही करत असतात, कधी ते चित्रकाराच्या भूमिकेत असतात, कधी लेखकाच्या, कधी ते निवेदकाच्या भूमिकेतून वेगवेगळे किस्से सांगतात तर कधी छान कविता-गाणी ऐकवतात. कधी काका आकाशातल्या चांदण्या समजावून सांगतात तर कधी गणितं सोडवून दाखवतात. कधी भरभरून कौतुक करतात तर काही चुकल्यास त्याचं हक्काने समजावून सांगतात. कधी सामाजिक विषयांवर चर्चा करतात, कधी परखड टीका तर कधी तितक्याच आत्मीयतेने हळवेपणा जपतात.

ह्याच आठवणींच्या सिनेमातलं अजून एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे काकांचं घर!

काकांसारखचं त्यांचं घर सुद्धा मनाने खूप मोठं! कायम सगळयांच्या स्वागताला तयार. खूप छान छान चित्र, पुस्तकं... भारी एकदम!
आमच्या गप्पांचा अड्डा, नाटकाच्या तालमीचं, गाण्यांच्या मैफिलीचं ठिकाण. काकांसोबत गप्पा म्हणजे काहीतरी नवीन शिकायला मिळणार हे नक्की. काकांनी आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर एकांकिका बसवल्या, खूप बक्षिसं  मिळवली, तन्वीर नाट्यकर्मी सारखा मोठा पुरस्कार सुध्दा त्यांना मिळाला.
असं म्हणतात की कलेला कसलीच सीमा नसते, बंधन नसतं. काकांनी त्यांच्यातला कलाकार पण असाच जोपासलाय. निर्मितीपासून अगदी infinity पर्यंत... बेभान !

डॉ.काकांचीच एक कविता त्यांची खरी ओळख करून देते त्यातल्या ह्या काही ओळी...

हातात सूर्य येता
उजळीत विश्व गेलो
अन स्ने-चांदण्या
मी अमृतात न्हालो

विश्वा मनी होता
श्वासात छंद आणि
रंगात चिंब होता
मी इंद्रधनू झालो

मित्रांसवे असे मी
माझे मलाच गुणले
एकाच आयुष्याचे
मी जन्म दहा केले.


- गौरी अजय चिंदरकर
07/02/2018

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. मस्त👌👌👌 आम्हाला पण डॉ. काका ना भेटायला आवडेल.... आज कळलं... तुझं हे व्यक्तिमत्त्व अष्टपैलूं कसं😊😊😊😊 keep it up 👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much Bhate :) Nakki bhetu Dr. kaka nna :)

      Delete
  3. छान ....त्याच् गोड स्मितहास्सा सारखं...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

रेषा