रिहर्सल डायरीज #2 म्युझियम




नेहमीप्रमाणे त्यादिवशीसुद्धा सगळ्यांच्या आधी मी रिहर्सलला पोहोचले. डॉ.काका काहीतरी शोधत बसलेले. त्यातच त्यांनी एक-दोन जुनी पत्र दाखवली. त्यांनी जपून ठेवलेल्या लिखित स्वरूपातल्या आठवणींबद्दल ते मला सांगत होते. मला सुद्धा एक-दोन जुन्या स्क्रिप्टस वाचायच्या होत्या त्या ही मी त्यांच्याकडून घेतल्या.

'संडे हो या मंडे' आणि 'अँड दि ऑस्कर गोज टू' ही डॉ. काकांनी लेखन-दिग्दर्शन केलेल्या नाटकांपैकी दोन नाटकं ज्यात मीही काम केलेलं. असाच विषय निघाला आणि 'अँड दि ऑस्कर गोज टू' मधल्या 'म्युझियम'ची आठवण झाली. जुन्या नाटकातल्या संवाद, नेपथ्य अश्या बऱ्याच गोष्टी आठवल्या. त्यानंतर रिहर्सल सुरु झाली. थोडंफार वाचन झालं  त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया, अजून काही नवीन संकल्पना कश्या उभारता येतील यावर चर्चा झाली आणि मग सुरु झाल्या त्या गप्पा !

गप्पा ! आमच्या रिहर्सलचा अनिर्वाय भाग. त्या कधी-कश्या- कुठून सुरू होतील याचा काही नेम नाही. नाटकपासून सुरू झालेलं आमचं चर्चासत्र शेती, राजकारण, तंत्रज्ञान अशी  खूप वेडीवाकडी वळणं घेऊन गावातल्या 'unique' माणसांवर येऊन थांबलं आणि खरी मज्जा इथूनच सुरू झाली. गावातल्या बऱ्याचशा व्यक्ती कश्या वल्ली आहेत याच प्रत्येकजण उदाहरण देत होता. खूप जुने किस्से, आठवणी सगळे सांगत होते. पु. लं. च्या 'व्यक्ती आणि वल्ली' चा दुसरा भाग कदाचित 'मित्र, शिरगाव' प्रकाशित करु शकेल अशी काहीशी कल्पना डोक्यात येऊन गेली.

अगोदरची पिढी कशी रसिक होती, त्यांनी गावात आणलेली नाटकं, रंगवलेली स्त्रीपात्र, तंबूत बघितलेले सिनेमे, काही सिनेमांच्या मिळालेल्या फिल्म्स घरी नेऊन घरात बनवलेले सिनेमांचे तंबू अश्या खूप गमतीजमती आम्ही ऐकत होतो. सगळे त्यांनी लहानपणी केलेल्या करामती सांगत होते. त्यावेळीचं वातावरण, अनुभव, सोयी-सुविधा यावर भरभरुन बोलत होते.

त्यादिवशी डॉ.काका-काकी, नाना दादा, अण्णा दादा, सचिन दादा, डोर्ले काकी सगळे एक वेगळीच भूमिका निभावत होते, ती म्हणजे catalyst ची! त्यांच्या आधीच्या पिढीने जपलेला ठेवा ते सगळे त्यांच्या नंतरच्या पिढीकडे सुपूर्द करत होते. एखाद्या म्युझियम मधल्या गोष्टी जितक्या अमूल्य असतात तेव्हढाच तो आठवणींचा ठेवा निर्मळ आणि अमूल्य होता. त्या सगळ्यांनी मिळून  आमच्यासमोर एक नवं म्युझियम उभं केलं, 'आठवणींचं म्युझियम'!!!


- गौरी अजय चिंदरकर.
15/10/2017

Comments

Post a Comment