रेषा
हाती एक कागद कोरा त्यावर एक रेषा कधी इथे तर कधी तिथे वळवळणारी ! माहित नाही तिला शांतता अधीरतेने नुसती धावणारी रिकामी जागा शोधत फक्त उमटणारी! कधी नव्हे ती जरा पहुडली आजूबाजूला पाहू लागली निशब्दता एका क्षणी स्वतःच्याच गुंत्यात अडकलेली! कुठे घट्ट गाठ, कुठे स्वतःच अडवलेली वाट, कुठे उगाच घुसखोरी, एव्हढं करूनही पाटी मात्र कोरी! ऐक जरा, क्षणभर थांब जरा, वेग तुझा आवर जरा! थबकलीस? हरकत नाही. थांबव आता गुदमरणं स्वतःच्याच कोड्यात दोन पावलं टाक जरा माघारी नको उगाच जिंकण्याची घाई! संयमाने चाल पुन्हा तुझा तोच रस्ता पण आता नव्या ध्येयवेडाने अनुभवांच्या शिदोरीने! पुन्हा एक कागद कोरा पुन्हा त्यावर एक रेषा मुक्तपणे विहरणारी सांगे जगा गोष्ट न्यारी! -गौरी अजय चिंदरकर 11/03/2019 P.S. Inspired by Project Semicolon. (To know more about Project Semicolon visit: https://projectsemicolon.com/ )